जत्रेसाठीची वर्गणी शाळा इमारतीसाठी खर्च

* स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकत्र ः हिवरे कुंभार गावाची आदर्श गावाकडे वाटचाल
* युवकांनी एकत्र येऊन गावाच्या स्वच्छतेसाठी मोहीम घेतली हाती
* विधायक कामांसाठी होतोय व्हॉटस्‌ऍप ग्रुपचा वापर
शिक्रापूर  (वार्ताहर) – हिवरे कुंभार (ता. शिरूर) जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. ही इमारत बांधण्यासाठी गावातील प्रमुख गावकऱ्यांनी गावाची जत्रा रद्द करून यात्रेची जमा झालेली वर्गणी ही खर्च केली आहे. या गावाने नवा आदर्श घालून दिला असून हिवरे कुंभार हे आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील युवकांनी एकत्र येऊन गावच्या स्वच्छतेसाठी मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायतचे माजी पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरीत्या एकत्र येऊन गावातील सार्वजनिक ठिकाणची साफसफाई करत आहेत.
विशेष म्हणजे या कामी युवकांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये माजी सरपंच विकास शिर्के, राहुल टाकळकर, राजाराम गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, बाजीरांग गुंजाळ, दीपक जगताप, परशुराम साळुके, दादाभाऊ गायकवाड, अरुण साळुके, सोमनाथ आडाळगे, पांडुरंग मांदळे, सुरेश टाकळकर, अमोल झेंडे आदी युवक प्रामुख्याने भाग घेऊन ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात.

युवक-ज्येष्ठांमध्ये विचारांची देवाण-घेवाण
युवक आणि ज्येष्ठ ग्रामस्थांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी गावातील प्रत्येक युवकाचा वाढदिवस गावातील शक्‍य ज्येष्ठ ग्रामस्थांना बोलावून गावातच साजरा केला जातो. यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. यावेळी व्यसनमुक्तीचा संदेश देखील दिला जातो. गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत केली जाते.

संकटसमयी मिळतो मदतीचा हात
काही दिवसांपूर्वी साक्षी कुंभार या विद्यार्थिनीस सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान हाताला दुखापत झाली होती. परंतु साक्षीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गावातील युवकांनी व्हॉट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांना मदतीचे आवाहन करताच गावकऱ्यांनी तब्बल साठ हजार रुपये जमा केले होते. पण ही गोष्ट शिक्रापूर येथील डॉ. राम पोटे यांच्या लक्षात आल्यानंतर डॉ. पोटे यांनी सामाजिक भावनेतून साक्षीवर निम्म्या खर्चात उपचार केले. तसेच गावातील युवक अमित जाधव याला देखील मेंदूच्या शश्‍त्रक्रियेसाठी व्हॉट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून तब्बल दोन लाखांची मदत युवकांनी मिळवून दिली आहे.

व्हॉटसऍपचा असाही चांगला वापर
दुःखद आणि सुखद घटना ग्रामस्थांना कळवणे, संकटसमयी मदतीला धावणे, उद्याच्या स्वच्छतेची सार्वजनिक जागा कळविणे, नवीन योजना कळविणे, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी सुचवलेली विकासकामांची माहिती देणे, नवीन शासन निर्णय कळविणे, सार्वजनिक कामासाठी आवाहन करणे अशा अनेक प्रकारच्या विधायक कामांसाठी व्हॉटस्‌ऍपचा ग्रुपचा वापर केला जातो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.