सर्व गुंतवणूकदारांसाठी योजना उपलब्ध; 8.50 टक्के व्याजदर
पुणे – कॉसमॉस बॅंकेकडून 14 फेब्रुवारी 2020 पासून सर्व गुंतवणूकदारांसाठी दीर्घ मुदतीची ठेव योजना- 8 (लॉंग टर्म सबऑर्डिनेटेड डिपॉझिट स्कीम-8) सुरू केली आहे. या योजनेत सर्व गुंतवणूकदारांना 8.50 टक्के द.सा.द.शे. व्याजदर लागू राहणार असून व्याजाची रक्कम त्रैमासिक देण्यात येणार आहे, अशी माहिती कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष, सीए मिलिंद काळे यांनी दिली.
दीर्घ मुदतीच्या या योजनेमध्ये किमान 10 हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक असून त्यापेक्षा जास्त रक्कम 1 हजार रुपयांच्या पटीत ठेवता येईल. या ठेव योजनेचा कालावधी 66 महिने असून व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी (त्रैमासिक) अदा करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांच्या सोईनुसार व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करता येईल अथवा इसीएसने व्याज अदा करता येईल.
सदर योजनेस नामांकनाची सुविधा उपलब्ध आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी व ठराविक रक्कम जमा होईपर्यंत सुरू राहणार आहे. सदर योजना रिझर्व्ह बॅंकेच्या व सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को.ऑपरेटिव्ह सोसायटीज्, नवी दिल्ली यांचे मान्यतेनुसार सुरू केली असून रिझर्व्ह बॅंकेचे असणारे सर्व नियम व अटी लागू राहतील. या योजनेमधील उत्तम व्याजदराचा लाभ घेण्यासाठी व योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपल्या नजीकच्या शाखेमध्ये संपर्क साधावा.