सोपानकाकांच्या पालखी मुक्‍कामासाठी पांगारे सज्ज

परिंचे- पांगारे (ता. पुरंदर) येथे संत सोपानकाका महाराज पालखीचा पहिला मुक्‍काम रविवारी (दि. 30) आहे. या  सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नीतानेकर यांनी दिली.

पालखी मार्गावरील विहिरी, हातपंप, बोरवेल, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची तपासणी करून शुद्धीकरण करण्यात आले आहे. पांगारे ते मांडकी पालखी मार्गावर सहा ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आले असून फिरती आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.यामध्ये आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेविका, औषध निर्माण अधिकारी, जल सुरक्षारक्षक व आशा स्वयंसेविका यांचा समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजूषा सानप यांनी सांगितले.

प्रशासनाच्या वतीने पांगारे येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत कुदळे, सुनंदा शिंदे, किरण धुमाळ, सूर्यकांत नेवसे, भास्कर कारकुड, ग्रामसेवक परशुराम राऊत, सुरेश गोंधळी आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.