पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भ्रष्टाचार हा खूप मोठा राक्षस असून आपल्या देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला मुळापासून काढून फेकण्यासाठी कार्य आपल्याला करायचे आहे. हे ध्येय मनाशी बाळगून भविष्यात वाटचाल करा, असा सल्ला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्डपिस युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित सोशल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (एसएलडीपी) समारोपात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. मेजर जनरल विक्रम देव डोगरा (निवृत्त), युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवी चिटणीस आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठात नव्यानेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
युवकांनी आयुष्यात ध्येय निश्चित करावे आणि त्याकडे सुसंगत वेगाने जावे. कधीही हार मानू नका, जे प्रयत्न सोडतात त्यांना यश मिळत नाही. जीवनात यशस्वी व्यक्तीमत्त्वाचा आदर्श पुढे ठेऊन वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
विद्यापीठातील शैक्षणिक सोयीसुविधांचा वापर करून खूप शिक्षण घ्या. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला लोकांची मदत करायची आहे या भावनेने वाटचाल करा.
आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवा, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा, इतरांचे ऐकून घेण्यासाठी कायम संयम ठेवावा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात देशाचे नेतृत्व करायचे आहे हे लक्षात ठेऊन विद्यापीठीय अभ्यासक्रमासोबतच आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींचे शिक्षण घेऊन वाटचाल करावी.
स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल केल्यास आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि यशस्वी व्हाल, असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी स्पष्ट केले आहे.