पालिकेतील भ्रष्टाचार “राष्ट्रवादी’च्या सहकार्यातून

नगरसेविका सीमा सावळेंचा आरोप : ठराविक नेत्यांचे सभागृहात कौतुक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने “करोना’ कालावधीत केलेल्या खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार्यातूनच झाला असून या पक्षाच्या अनेकांनी आपले हात “ओले’ केल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केला. मात्र हा आरोप करताना काही ठराविक नगरसेवकांचे कौतुक त्यांनी केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवक महापालिका प्रशासनावर तोंडसुख घेत होते. यामध्ये राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आघाडीवर होते. यावेळी बोलण्यास उठलेल्या सीमा सावळे यांनी थेट राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या पक्षाच्या अनेक नगरसेवकांचे ठेकेदारांशी संबंध असून अधिकाऱ्यांच्या अँण्टीचेंबरमध्ये बसून दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांनी आरोप करू नयेत, असे सांगत त्यांनी चांगलेच राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले.

एका बाजूला आरोप करत असताना मात्र मंगला कदम, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर यांचे शहराच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. पक्षावर आरोप आणि व्यक्‍तिगत कौतुक अशी एकाच वेळी त्यांनी दुहेरी भूमिका घेतल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सावळे यांच्या पुढाकारातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधात समांतर फळी तर उभी केली जात नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.