पिंपरी – भामा-आसखेड जॅकवेलच्या निविदेमध्ये 20 ते 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले असून ही निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराची पात्रता तपासावी. या निविदेतील भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आमदार जगताप यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होत असलेल्या आरोपावर शिक्कामोर्तबच झाल्याने मानले जात आहे.
याबाबत आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना ईमेल पाठवित वरील मागणी केली आहे. तत्पूर्वी या निविदेत 30 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आरोप केला होता. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जगताप यांनीच या निविदेतील भ्रष्टाचारावर “प्रहार’ केल्याने भाजपामधील अंतर्गत दुफळीही समोर आली आहे.
आमदार जगताप यांनी आयुक्तांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानी व आडमुठ्या कामाच्या पध्दतीमुळे पाणी पुरवठा विभागाच्या निविदा भरण्याच्या भानगडीत नवीन कंत्राटदार पडत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. भामा आसखेड जॅकवेल कामाच्या निविदेची प्रक्रीया ही अत्यंत अपारदर्शी, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन पूर्ण केली जात आहे. प्रथम दर्शनी या कामात कमीत कमी 20 ते 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे.
जॅकवेलची निविदा प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात यावी. या निविदा प्रक्रियेत पात्रता निकष हे निष्पक्षपणे लावण्यात आलेले नसून फक्त एकाच कंत्राटदारास निविदेतील काम मिळावे म्हणून पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्ग निवडला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. निविदा प्रक्रियेतील पात्रता निकषाबाबत निविदा दाखल केलेल्या सर्व कंत्राटदारांच्या पात्रता पडताळून घेण्यात याव्यात. त्यानुसारच निविदा प्रक्रिया पार पाडण्यात यावी. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळावे, असेही पत्रात
म्हटले आहे.
जॅकवेल निविदेवरून भाजपमध्ये दुफळी माजणार?
महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. तर राज्यातील सत्तांतरानंतर भाजपने आपल्या मर्जीतील शेखर सिंह यांना महापालिकेत आयुक्त म्हणून आणले. आयुक्त सिंह यांच्या आडून शहर भाजपचे नेते महापालिका लुटून खात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. जॅकवेल निविदेतील भ्रष्टाचाराविरोधात शहर राष्ट्रवादीने बुधवार (दि.30) रोजी महापालिकेत जोरदार आंदोलन केले. आता भाजपचे आमदार जगताप यांनीच या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्याने शहर भाजपमध्ये मोठी दुफळी माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपला ही दुफळी चांगलीच महागात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एक ई-मेल अन् भाजपमध्ये खळबळ
भामा आसखेड जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप करून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते भाजपाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा घाट घातला आहे. या कामात भ्रष्टाचार झाला असेल किंवा भाजपा नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करावे, तर राजकारणातून सन्यास घेईल, असे आव्हान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी दिले आहे. असे असताना दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी जॅकवेलच्या निविदेत 20 ते 25 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा पालिका आयुक्तांना ई-मेल धाडला. त्यामुळे शहर भाजपमध्ये आणि राजकीय वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे. आमदार जगताप यांनी शहर भाजपला घरचाच आहेर दिल्याने भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे जॅकवेल निविदेसंदर्भात ई-मेलद्वारे पत्र आले आहे. निविदेमध्ये सहभागी झालेल्या कंत्राटदारांच्या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
– श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग