टोकियो – कोरोनाचा धोका असतानाही गेल्या वर्षी जपानने टोकियो ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले. त्यासाठी जागतिक क्रीडा क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत असतानाच या स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयोजक समितीतील एका सदस्यासह एकूण चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन व्यक्ती या स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या कंपनीचे बडे व्यक्ती आहेत. त्यांच्याच कंपनीने खेळाडूंच्या जर्सी तयार केल्या होत्या.
आयोकी होल्डिंग्स कंपनीचे माजी प्रमुख व कंपनीमधील दोन कर्मचाऱ्यांकडून देंतसू या जाहिरात कंपनीचे माजी कार्यकारी अधिकारी हारुयुकी ताकाहाशी यांनी लाच घेतल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. जपानच्या खेळाडूंनी या कंपनीने तयार केलेल्या जर्सी वापरल्या होत्या. याचप्रसंगी इतर देशांतील खेळाडूंनी इतर दिग्गज ब्रॅंडच्या जर्सी परिधान केल्या होत्या.
आयोकी हे तरुणांसाठी बनवण्यात येणाऱ्या ड्रेसेसच्या कंपनीशी जोडलेले आहेत. मात्र, खेळाडू परिधान करीत असलेल्या कपड्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही. खेळ आणि ऑलिम्पिकशी संबंधित उत्पादनांच्या प्रायोजकत्वाशी संबंधित ही लाच घेतल्याचा संशय आहे. या समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये एका बड्या व्यक्तीने भ्रष्टाचार केल्याची चर्चा स्पर्धेच्या समाप्तीनंतर सुरू झाली होती.
दरम्यान, हारुयुकी ताकाहाशी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मला केवळ सल्लागार म्हणून मानधन देण्यात आले. ताकाहाशी यांनी स्थानिक प्रायोजकांकडून तब्बल 3 अब्ज डॉलर्सची लाच घेतल्याचे बोलले जात आहे.