मुंबई : राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमीनखोरीसाठी भाजपा सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून भाजप सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे
अतुल लोंढे म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा फक्त आठ महिन्यात कोसळणे ही महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या मनाला वेदना देणारी घटना आहे. शिंदे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करून निव्वळ इव्हेंटबाजी केली पण कामाच्या निकृष्ट दर्जाचे काय ? कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे काय? संसद, राम मंदिर, अटल सेतू सारखे निकृष्ट कामांचे अनेक नमुने देशाने पाहिले पण महाराष्ट्रातल्या जनतेला आपली अस्मिता अवघ्या आठ महिन्यात कोसळताना बघावे लागेल असे वाटले नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काम सुरू असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? हा शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे. मग आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे असेही अतुल लोंढे म्हणाले.