सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सातारा – अवैध प्रवासी वाहतुक करण्यासाठी परवानगी देतो, असे सांगत चालकाला दोन हजाराचा मासिक हप्ता मागणारा शिरवळ पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार चतुर्भुज नारायण चव्हाण (वय 50 रा. शिरवळ) याला सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने रंगेहात पकडले. त्याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मारूती ओम्नी व्हॅनला परवानगी देण्यासाठी चव्हाण याने दरमहा दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने सातारा सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणीची तक्रार केली.
त्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा लावत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यात चव्हाण लाच मागत असल्याचे समोर आल्यानंतर एसीबीने गुरूवारी शिरवळ येथे सापळा लावला होता. त्यात चव्हाण तक्रारदाराकडून दोन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला.
त्याच्याविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संजय साळुंखे, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय अडसुळ, प्रशांत ताटे, मारूती अडागळे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश वायदंडे, शीतल सपकाळ यांनी केली.