वाढत्या करोनामुळे युवक कॉंग्रेसकडून परिसरात बॅनरबाजी
वडगावशेरी – रामवाडी वसाहत येथे गेल्या काही दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्या वाढत आहे. याकामी उपाययोजना होत नसल्याने युवक कॉंग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
करोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभागासह परिसर करोनामुक्त करण्याकरिता लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून यंत्रणेस सहकार्य केले जात नसल्याने नागरिकांतून संतप्त भावना उमटत आहेत.
रामवाडीमध्ये वेळीच उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर तर करोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता, असे युवक कॉंग्रेसचे अभिजित रोकडे यांनी म्हटले आहे. यंत्रणेला सहकार्य तर सोडाच परंतु, कोणी याबाबत विचारपूसही करीत नसल्याचे रोकडे यांचे म्हणणे आहे. याच करणातून नगरसेवक हरवले आहेत, आता आजारात सोडलं तसं आम्ही मतदान करताना सोडतो. त्रस्त रामवाडीकर, अशा आशयाचे फलक लावले असल्याचे त्यांनी सांगितले.