पुणे – मनपा पदाधिकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या उपायुक्ताला एका भाजप नगरसेविकेच्या पतीराजाने रस्त्यातच शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही शिविगाळ जिव्हारी लागलेला अधिकारी थेट पोलिसांत तक्रार देणार असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एका पदाधिकाऱ्याचा वाढदिवस होता. त्याबाबत शुभेच्छा देण्यासाठी संबंधित अधिकारी या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात गेला होता. त्याचवेळी संबंधित नगरसेविकेचा पतीही तेथे आला होता. या पदाधिकाऱ्यास शुभेच्छा दिल्यानंतर नगरसेविकेचा पती तसेच अधिकारी कार्यालयाबाहेर आले.
यावेळी नगरसेविकेच्या पतीने “आमच्या भागात कारवाई करू नका, तुमचे कर्मचारी हप्ते घेतात. आम्हांला माहिती आहे. तुम्ही त्यात सहभागी आहात,’ असे अधिकाऱ्याला सुनावले. त्यानंतर संतापलेल्या अधिकाऱ्याने “आरोप करू नका मी अधिकारी आहे, आरोप करायचे असतील तर पुरावे द्या’ असे सुनावले. त्यानंतर या दोघांमध्ये भररस्त्यातच खडाजंगी झाली.
त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र, संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने महापालिका आयुक्तांना या प्रकारची माहिती देत थेट पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकाराची महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे.