नगर : करोना नियंत्रणासाठी नगरसेवकांची आरोग्य समिती

अध्यक्षपदी डॉ. सागर बोरुडे ; सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांचा समितीत समावेश

नगर : शहरात करोना संसर्गाचा कहर सुरु झाला आहे. त्यात लसीकरणाचा गोंधळ, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, संशयित रुग्णांच्या तपासणीसह एकूणच करोना संसर्ग रोखण्यासाठीच्या सर्व उपायोजनाचा ताळमेळ चुकलेला आहे. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी व तसेच नव्याने नियंत्रणासाठी सर्वपक्षीय आजी-माजी 7 नगरसेवकांची आरोग्य समिती स्थापन करण्यात आली आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांच्या मान्यतेने व सर्व आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सूचनेवरुन डॉ. सागर बोरुडे यांची या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी करायच्या उपाययोजना व करोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सुविधा कशा मिळतील? याचा रोडमॅप ही समिती करणार आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कार्यालयात आज सर्वपक्षिय आजी-माजी नगरसेवकांची बैठक झाली. त्यात ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. शहराती नागरिकांना योग्य ते उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच त्यासंदर्भातील येणार्‍या अडचणी सोडविण्याच्या दृष्टिने ही सर्वपक्षिय समिती काम करणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती, उपसभापती हे या समितीचे पदसिध्द सदस्य असतील, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

अशी आहे समिती 
अध्यक्ष: डॉ. सागर बोरूडे (राष्ट्रवादी), सदस्य : निखील वारे, (माजी नगरसेवक,कॉग्रेस), संजय ढोणे, (सामाजिक कार्यकर्ते, भाजपा), सतिष शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, भाजपा), सचिन शिंदे (नगरसेवक, शिवसेना), विपुल शेटीया (नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस) सचिन जाधव (माजी नगरसेवक, बसपा)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.