देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळी घासून गेल्याने ते बचावले आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान नगरसेवक जिंकी ऊर्फ विशाल खंडेलवाल (वय 32 , रा. मेन बाजारपेठ, देहूरोड) गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बाजारपेठ येथील कार्यालयाजवळ काही नागरिकांशी बोलत उभे होते. त्यावेळी दुचाकीवरुन तिघे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी खंडेलवाल यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही, परंतु पळताना पडल्याने ते किरकोळ जखमी झाले. खंडेलवाल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी काडतुसाची पुंगळी आढळून आली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.