नगरसेवकाने अडविले स्थायी समितीचे दार!

विस्कळीत पाणी पुरवठ्याचा निषेध : आयुक्त, सुरक्षा रक्षकांबरोबर वादावादी

पिंपरी  – ऐन गणेशोत्सवात पिंपळे निलख, विशालनगर, वाकड भागात विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन दाद देत नसल्याचा निषेध करीत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आधी पाणी द्या, मग सभा घ्या, अशी भूमिका घेत स्थायीचे “दार अडविले’. तसेच आयुक्तांना सभेला जाण्यापासून रोखल्याने आयुक्तांसह सुरक्षा रक्षकांबरोबर वादावादी झाली.

पिंपळे निलख, विशालनगर आणि वाकड हा भाग शहराच्या शेवटचे टोक आहे. या भागात सतत विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांकडून तक्रारींचा भडीमार सुरू आहे. पुरेशा पाण्याअभावी नागरिकांची ससेहोलपट होत असताना प्रशासन आपल्याच कारभारात दंग आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याकडे थेट महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांसह नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका मुख्यालय गाठले.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर आज स्थायी समितीची विशेष सभा बोलविण्यात आली होती. स्थायी समिती सभागृहाच्या प्रवेशद्वाराला ते कुलूप लावत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले त्यावरुन त्यांच्यात झटापटी झाली. कामठे यांनी प्रवेशद्वाराला कडी लावली. तसेच स्थायीच्या विशेष बैठकीला जाणाऱ्या अधिकारी व सदस्यांना आत जाण्यास मज्जाव केला. दरम्यान, आयुक्त हर्डीकर देखील येथे आले. आयुक्तांना स्थायीच्या दारासमोर अडवून त्यांना जाब विचारला.

यावेळी आयुक्त व कामठे यांच्यात वाद झाला. या आंदोलनाचे चित्रीकरण करत असताना आयुक्तांनी हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याने वाद आणखीनच चिघळला. संतापलेले आयुक्त सभा सोडून परत निघाले. मात्र, सभापती विलास मडिगेरी यांनी त्यांची समजूत काढली. दरम्यान, दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन आयुक्तांकडून नगरसेवकांना देण्यात आले. आचारसंहितेच्या तोंडावर स्थायी समितीने घेतलेली विशेष सभा सत्ताधारी नगरसेवकांच्या आंदोलनामुळे चर्चेची ठरली.

वाकड, पिंपळे निलख परिसर विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना करीत आहे. वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला. स्थायी समितीची विशेष सभा घ्यायला प्रशासनाला वेळ आहे. परंतु, पाण्यासारख्या मुलभूत प्रश्‍नासाठी वेळ नाही.

– तुषार कामठे, नगरसेवक, भाजप

Leave A Reply

Your email address will not be published.