पालिका मुख्य इमारत होणार ‘लॉकडाऊन’

रुग्ण वाढल्याने निर्णय : कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक करोना विळख्यात

पुणे – महापालिका मुख्य इमारतीमध्ये कामानिमित्त आलेले कर्मचारी, पदाधिकारी आणि नगरसेवक करोना विळख्यात सापडू लागले आहेत. त्यामुळे मुख्य इमारत सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते तसेच ठेकेदारांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर, ज्या नागरिकांना अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांना भेटायचे आहे. त्यांनाही पूर्वसूचना देऊन तसेच संबंधितांची वेळ घेऊन त्याचवेळेत पालिकेत येता येणार आहे. त्याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्‍त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शहरात 1 जूनपासून लॉकडाऊन शिथिल केले आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात वर्दळ वाढत असतानाच पालिका मुख्य इमारतीमध्ये नव्याने रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच, नियमित वावर असलेला कंटेन्मेंट झोनमधील एक नगरसेवक, विरोधीपक्षाच्या नेत्या, कर संकलन विभागातील शिपाई, सहायक आरोग्य प्रमुख कार्यालयातील शिपाई, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील शिपाई, महापालिकेत येणारे आरोग्य निरीक्षक तसेच इतर काही कर्मचारीही बाधित सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासह कार्यालयेही बंद ठेवण्याची वेळ येत आहे.

तर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, ठेकेदार तसेच सर्वसामान्य नागरिकांची गर्दी लक्षणीयरीत्या वाढली आहे. तर, अनेकजण कोणतीही काळजी घेताना आढळत नाहीत. त्यामुळे मुख्य इमारतीमध्ये करोना प्रसाराचा धोका वाढला आहे. तर, करोना प्रतिबंधाचे काम महापालिकेच्या मुख्य इमारतीमधूनच चालत असल्याने इथे रुग्ण वाढल्यास त्याचा परिणाम करोना नियंत्रणाच्या कामावर होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य इमारतीमधील नागरिकांच्या वर्दळीवर नियंत्रण घालण्यात येणार आहे.

मुख्य इमारतीत गर्दी कमी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कार्यकर्ते, नागरिकांवर बंधने आणली जातील. महापालिका प्रशासनाशी याबाबत चर्चा करून केवळ अत्यावश्‍यक बाबींसाठीच महापालिकेत प्रवेश दिला जाईल. त्याबाबत, सोमवारी आयुक्‍तांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेतला जाईल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.