पुणे : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांचा एक भाग म्हणून कॉर्पोरेट आणि संस्था यांनी पुणे महापालिकेला 30 फॉगिंग मशीन्स दिल्या. शहरातील विशेषत: महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेची स्थिती सुधारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
3 जून 2022 रोजी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते फॉगिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्सिस्टंट फाऊंडेशन, बर्नार्ड व्हॅन लीर फाऊंडेशन, सिटी कनेक्ट (लाइटहाऊस कम्युनिटी फाउंडेशन), ऑस्टिन पुणे सिस्टर सिटी इंटरनॅशनल (एपीएससीआय), भारत फोर्ज लिमिटेड आणि महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सीएसआरअंतर्गत करोना प्रादुर्भाव काळापासून आतापर्यंत संस्थांकडून मिळालेल्या योगदानाचे आणि नियमित समर्थनाचे आम्ही मनापासून कौतुक करतो. संस्थेच्या अशा उपक्रमांमुळे नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यात नक्कीच मदत होते, विशेषत: नव्याने विलीन झालेल्या गावांमध्ये आरोग्य आणि स्वच्छता वाढते, असे बिनवडे यांनी सांगितले.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, पुणे महापालिका ही स्वच्छ आणि राहण्यायोग्य शहरासाठी प्रयत्न करणारी देशातील अग्रगण्य नागरी संस्थांपैकी एक आहे. शहरी क्षेत्राचा विस्तार होत असताना, पीएमसी शहरात आरोग्य आणि स्वच्छताविषयक सुविधा आणि तरतुदींसाठी प्रयत्नांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.