पुणे – एजीए मॅनेजमेंट आयोजित पहिल्या एमरल्ड करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्लब, फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब आणि पुणे हरीकेन्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर झालेल्या या सामन्यात पुरुषोत्तम खांडेभराड याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा अखेरच्या षटकामध्ये आणि दोन गडी राखून पराभव केला. ग्लोबल वॉरियर्स संघाचा हा दोन सामन्यांमधील पहिलाच विजय ठरला.
सौरभ रवालिया याच्या 27 चेंडूतील 46 धावांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब संघाने गेम स्विंगर्स संघाचा 3 गडी राखून सहज पराभव केला. चार सामन्यांमधील फ्रेन्ड्स संघाचा तिसरा विजय ठरला.
आणखी एका सामन्यात कर्णधार वेंकटेश अय्यर याच्या भेदक गोलंदाजीमुळे पुणे हरीकेन्स् संघाने चॅम्पियन्स् क्रिकेट क्लबचा 56 धावांनी पराभव करून तिसऱ्या विजयाची नोंद केली. वेंकटेश याने 25 धावात 4 गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.