पुणे – पहिल्या अयोध्या वॉरियर्स करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्णधार निखील जैन याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर आर्च मॅव्हरिक्स क्रिकेट क्लब संघाने स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघाचा 97 धावांनी सहज पराभव करून विजेतेपदाचा करंडक मिळवला.
या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून आर्च मॅव्हरिक्स क्रिकेट क्लबने फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या फलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. निखील जैन याने आघाडीवर राहून संघाच्या डावाला आकार दिला. निखील याने 21 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. जयंत सावंत (39 धावा), अभिषेक चौधरी (36 धावा) व विमल हंसराज (27 धावा) यांनीही उपयुक्त धावा करत संघाला 20 षटकात 226 धावांचा डोंगर उभा करून दिला.
षटकामागे 11.30 सरासरी धावगतीचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या स्पार्टन्स क्रिकेट क्लबची सुरुवात खराब झाली. आर्च मॅव्हरिक्सचा डावखुरा जलदगती गोलंदाज निखील जैन याने पहिल्याच षटकात स्पार्टन्स संघाचे दोन फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर धावगती राखण्याच्या प्रयत्नात स्पार्टन्स संघाच्या फलंदाजांकडून चुका झाल्या.
स्पार्टन्सचा डाव 13.1 षटकात 129 धावांवर आटोपला. प्रतीक लवळेकर (24 धावा), शिवम गावडे (24) व गौरांग गोवांडे (20) यांचा प्रतिकार अपुरा पडला. निखील जैन (3-28), विमल हंसराज (3-29) व सुनील जाधव (3-20) यांनी अचूक व उत्कृष्ट गोलंदाजी करून संघाला 97 धावांनी विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण तेजस्वी प्लॅस्टिक्सचे प्रसाद हिरळकर, ए डी फिटनेसचे अभिजीत वारसकर, जोशी स्पोर्टसचे गणेश जोशी, नितीन आवेकर, गिरीष ओक, आदित्य पाळंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
अंतिम सामना ः आर्च मॅव्हरिक्स क्रिकेट क्लब ः 20 षटकात 6 बाद 226 धावा. (निखील जैन नाबाद 62, जयंत सावंत 39, किरण दातार 2-23). वि. वि. स्पार्टन्स क्रिकेट क्लब ः 13.1 षटकात सर्वबाद 129 धावा. (प्रतीक लवळेकर 24, निखील जैन 3-28, विमल हंसराज 3-29, सुनील जाधव 3-20). सामनावीर ः निखील जैन.