राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी
वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, आणि कॉर्पोरेट जगताने सुरू केलेल्या करोना लढ्यामध्ये लोकांनी स्वयंशिस्त आणि खबरदारी पाळून साथ दिली तर करोनावर मात करण्यात नक्कीच यश येऊ शकते.
करोना विरोधातील लढ्यात सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) निधीची मदत होऊ शकते, हे लक्षात घेऊन अजित पवार यांनी कॉर्पोरेट जगताला आवाहन केले, तसेच या कामी पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यामध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांचा समावेश आहे.
सीएसआर निधीचा उपयोग पुणे महापालिका, पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, ससून सर्वोपचार रुग्णालय यांना आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले. कौस्तुभ बुटाला, केपीएमजीचे रोहन सास्ते यांच्या प्रयत्नांमुळे ऍक्सिस बॅंकेने करोना लढ्यासाठी आवश्यक 5 कोटी रुपयांची साधनसामग्री उपलब्ध करून दिली. तसेच आयडीबीआय बॅंकेनेही 40 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
ऍक्सिस बॅंकेच्या वतीने पीपीई किट 4 हजार 800, एन 95 मास्क 10 हजार, सॅनिटायझर 30 हजार, इन्ट्युबेशन बॉक्स 450, सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशन 21 हजार किलोग्रॅम, बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप 1 हजार 126, एक वर्ष वॉरंटी असलेल्या थर्मल गन 285, ऑक्झिमीटर 521, निगेटिव्ह आयन जनरेटर 141, मोबाइल क्लिनिक 23 (एका महिन्यासाठी) उपलब्ध करून दिले आहे. करोना उपचारविषयक कार्यवाहीचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी ऍप सुविधाही आहे. उपलब्ध साधनसामग्रीतील काही मदत नागपूर, मुंबई, नवी मुंबईसाठीही वापरण्यात आली आहे.
करोना लढ्यात ससून रुग्णालय, पुण्यातील प्रशासन आणि लष्कराच्या सदर्न कमांडमध्येही माहिती-तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाची कार्यवाही सुरू झाली. त्यानुसार लष्कराकडे उपलब्ध असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच मॉड्युलर आयसीयूचे तंत्रज्ञान, उपकरणे कशी ठेवायची, कशी वापरायची याबाबतची माहिती आता प्रशासनाला मिळणार आहे. या बदल्यात राज्याकडे असलेल्या करोना नमुना तपासणीच्या सुविधेचा लाभ लष्कराला मिळणार आहे. एकाच वेळी 96 तपासण्या आणि साडेतीन तासांतच अहवाल देण्याची क्षमता पुणे प्रशासनाकडे आहे. याचा फायदा सदर्न कमांडला होणार आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ससून रुग्णालयात करोना परीक्षणासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी केली जात आहे. या प्रयोगशाळेत रोबोटीकचाही वापर करण्यात येत आहे. याशिवाय सीबी नॅट यंत्राचा वापरही सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे येत्या काळात पुण्यात जास्तीत जास्त तपासण्या होऊन करोनाचे जलद निदान करता येऊ शकेल.
सीएसआरच्या माध्यमातून ऍक्सिस बॅंकेने नॉन कोविड रुग्णांसाठी मोबाइल क्लिनिक व्हॅन, कोविड लक्षणांच्या तपासणीसाठी मोबाइल व्हॅन, आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून डिजिटल एक्सरेचे विश्लेषण, वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरती शौचालये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी टेलिमेडिसीन सुविधा पुरवण्यासाठी अद्ययावत ऍपची निर्मिती, कोविड-19 कंटेन्मेंट ऍपच्या माध्यमातून करोना योद्धे स्टाफ, स्वयंसेवी संस्था, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपक्रमांचे संनियंत्रण आणि ट्रॅकिंग करणे, रुग्णालयांमध्ये निगेटिव्ह आयन निर्मिती करणारी संयंत्र देणे, एनट्युबेशन बॉक्स, पीपीई किट, एन-95 मास्क, सॅनिटायझर, इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करणे यासाठी मदत केली.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केलेले डिजिटल एक्सरे सॉफ्टवेअर हे पूर्णपणे भारतात तयार करण्यात आले आहे. तरुण अभियंत्यांची टीम यासाठी धडपड करीत होती. त्यांना या कामी कौस्तुभ बुटाला यांनी मार्गदर्शन केले.
करोनाच्या साथीमुळे इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. मात्र, सर्व सुविधांनी युक्त फिरत्या दवाखान्यांमुळे लोकांना त्यांच्या विभागात वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांनीही लोकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेला करोनाचा धोका लक्षात घेऊन खास पोलिसांसाठी मोबाइल व्हॅन तैनात करण्यात आल्या. या व्हॅनमध्ये प्राथमिक लक्षणांवरून निदान करता यावे म्हणून डिजिटल एक्स-रे ची सोय केली आहे.
रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्यसेवकांना संसर्गाचा धोका लक्षात घेता रुग्णालयांमध्ये इनट्युबेशन बॉक्स देण्यात आले आहेत. या बॉक्समुळे रुग्णाशी थेट संपर्क टाळला जातो तसेच त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचारही करता येतात. डॉक्टर, आरोग्यसेवक सतत संसर्गाच्या छायेखाली असतात, यावर उपाय म्हणून आता रुग्णालयांमध्ये निगेटिव्ह आयन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रेही रुग्णालयांना पुरवण्यात आलेली आहेत.
संसर्गाच्या भीतीमुळे डॉक्टर्सनी आपली क्लिनिक बंद ठेवली. अशा परिस्थितीत रुग्णांना आधार देण्यासाठी सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एक टेलिमेडिसीन ऍप सुरू करण्यात आले. यासाठी आयडीबीआय बॅंकेची मदत झाली. स्मार्ट सारथी ऍपच्या जोडीने हे ऍप वापरता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या ऍपच्या माध्यमातून वैद्यकीय साहाय्य मिळवता येते. या ऍपचा फायदा सामान्य लोकांबरोबरच करोनामुळे घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना मिळणार आहे.
करोना लढ्यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सेवा-सुविधांसाठी कार्यरत मनुष्यबळाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी टेक्नो-पर्पल ऍपचे साहाय्य घेण्यात आले आहे. या ऍपमुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन या दोघांनाही खूप मदत होणार आहे. पीसीएमसी सारथी आणि पीएमसी केअर या दोन्ही ऍपमध्ये या ऍपचे इंटीग्रेशन झाल्यामुळे विविध सुविधांसाठी “एक खिडकी’ मांडणी तयार होणार आहे.
या ऍपवरील डॅशबोर्डमुळे कंटेन्मेंट भागामध्ये वेळेवर सुविधा पोहोचत आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. जीपीएसचा वापर करण्यात आलेल्या या ऍपमुळे केलेल्या कामाची खात्री आणि पडताळणी करता येते. बाधित क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालयांची कमतरता जाणवू नये म्हणून ऍक्सिस बॅंकेच्या माध्यमातून फिरती शौचालयेही देण्यात
आली आहेत.