बेंगलुरु: जगात थैमान माजवणाऱ्या करोना विषाणूने देशात पहिला बळी गेला असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये वयोवृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी याविषयी माहिती दिली. या व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांनी ट्वीट करुन या व्यक्तीचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती दिली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच या सर्व संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे.
The 76 year old man from Kalburgi who passed away & was a suspected #COVID19 patient has been Confirmed for #COVID19. The necessary contact tracing, isolation & other measures as per protocol are being carried out.
— B Sriramulu (@sriramulubjp) March 12, 2020
जगातील तब्बल शंभरहून अधिक देशात करोनाचा फैलाव झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून महारोगाईची घोषणा केली असून जगभरात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक करोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहे. ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून तर मुंबईतील रुग्ण दुबईहून आला होता. मुंबईतील रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान करोना विषाणू हा जगभरातील 111 देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूने जगात महामारी म्हणून घोषित केले आहे.