पुणे – दरवर्षी दणक्यात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी मात्र करोनाच्या सावटाखाली बेरंगी झाली. अनेकांनी सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने घरीच राहणे पसंत केले. मात्र, यामुळे रंगपंचमीलाच करोनाची बाधा झाली हे देखील मान्य करावे लागेल.
करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असल्याने आणि त्यातून पुण्यात एकामागून एक करोनाचे दहा रुग्ण आढळल्याने पुणेकरांची पाचावर धारण बसली आहे. सर्दी, खोकला, ताप हीच या रोगाचीही लक्षणे आहेत. त्यातून धुळवड आणि रंगपंचमी हे पाण्याच्या माध्यमातून खेळले जाणारे सणही याच काळात आले आहेत. त्यातून भिजल्याने सर्दी, खोकला, ताप येणे साहजिकच होऊ शकते. हे सण साजरे करताना काळजी घ्या, असे आवाहन या आधीही सरकारने केले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर रंग खेळण्यापेक्षा आणि ओल्या रंगांमध्ये भिजण्यापेक्षा अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. तर, काही तरुणांनी कोरडा रंग खेळत रंगपंचमी साजरी केली. दरवर्षी गल्लोगल्ली रंगलेले तरुण-तरुणी यांचे ग्रुप्स रंग खेळताना दिसत होते. शाळा, महाविद्यालयांमध्येही कामकाज संपल्यावर रंग खेळण्याला सुरूवात होत होती. याशिवाय, वाडे, सोसायट्या, गृहनिर्माण सोसायट्या यामध्येही कुटुंबातील सर्वच सदस्य रंगपंचपीच्या सणात रंगून निघत होते. मात्र, यंदा हा कुठलाच रंग दिसला नाही.