ब्राझीलिया – सध्या जगात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार पसरला आहे. त्यामुळे सर्व देशात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा कोरोनाने आपले भयानक रुप दाखवायला सुरुवात केली आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात कोरोनाने आता उग्र स्वरुप धारण केले आहे.
कारण मागील काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये गुरुवारी एकाच दिवसात एका लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा तीन लाखांच्या पार गेला आहे.
काही दिवसांपासून जगभरात पुन्हा एकदा करोनाची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्या अमेरिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतही करोना बाधितांची संख्या प्रमुख्याने वाढत आहे. ब्राझीलमध्ये करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भितीचे वातावरण दिसून येत आहे. या देशात एकाच दिवसात सर्वाधिक 3251 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा तीन लाखांच्या पार गेला आहे.
ब्राझीलमध्ये 3251 लोकांचा कोरोनाने मृत्यू झालेला हा आकडा मंगळवारी नोंदवला गेला. या देशातील सर्वाधिक लोकसंख्या साओ पाउलोमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक 1021 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या आगोदर येथील एकाच दिवशी मृत्यू झालेला लोकांचा सर्वाधिक आकडा हा 713 होता. ही आकडेवारी मागील जुलै महिन्यातील आहे.
या महामारीमुळे ब्राझील देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हॉस्पिटलवर ताण आला आहे. यामुळे आय.सी.यू विभागात ऑक्सिजन साठ्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनांकडून कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे.