एकूण करोना रुग्ण 497 : शहरातील 38 तर शहराबाहेरील 11 जणांना लागण
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात आणखी 38 जणांना शुक्रवारी (दि. 29) करोनाची लागण झाली. तसेच शहराच्या हद्दीत उपचार घेत असलेले परंतु शहराबाहेरील रहिवाशी असलेल्या 11 रुग्णांना “करोना’ची लागण झाली आहे. आज वाढलेल्या 38 रुग्णांमुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 497 पर्यंत जाऊन पोहचली आहे. सांगवी येथील ज्येष्ठ नागरिक (वय – 75) आणि जुन्नर येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
बाधित रुग्णांमध्ये 18 पुरुष व 20 महिला रुग्णांचा समावेश आहे. आज चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, चऱ्होली, सांगवी, नेहरुनगर, दापोडी, वाकड या रुग्णांचा समावेश आहे. शहराबाहेरील मात्र महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 11 जणांचा अहवाल देखील आज पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये 10 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. संबंधित रुग्ण जुन्नर, कसबा पेठ (पुणे), राजगुरूनगर, देहूरोड, औंध, खडकी, सोलापूर, आंबेगाव येथील रहिवाशी आहेत.
आज 14 रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. चिखली, आनंदनगर परिसरातील हे रुग्ण आहेत. तर, शहराबाहेरील शिवाजीनगर, बीड येथील करोनामुक्त झालेल्या रुग्णांना देखील घरी सोडले आहे. आजपर्यंत शहरातील 211 रुग्ण हे करोनामुक्त झाले. तर, महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेले शहराबाहेरील 25 रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.
तीन परिसर केले सील….
महापालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून तीन परिसर पुढील आदेशापर्यंत सील केले आहेत. सिद्धार्थ बिल्डिंग-अजंठानगर (अमृतकृपा हौसींग सोसायटी – ट्रॉन्सपोर्ट कार्पे ऑफ इंडिया – विनोद व्हरायटी परिसर), नेहरुनगर – कुलदीप आंगण (तरटे किराणा दुकान – लक्ष्मी टेफ्लॉक्स – कुलदीप आंगण सोसायटी – अमिर चिकन सेंटर) आणि सोनकर चेंबर्स-पिंपरी (गरीब नबाब हॉटेल – गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स – नानल हॉस्पिटल) आदी परिसराचा त्यामध्ये समावेश आहे.