पुणे -करोनामुळे प्रकृती अधिच बिघडल्यावर ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला आहे. त्यांना रेमडेसिविरचा उपयोग नसल्याचा निष्कर्ष राज्य सरकारच्या टास्क फोर्सने काढला असून, अशा रुग्णांना रेमडेसिविर न देण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या एक-दोन दिवसांत करोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यासाठी नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्याची शक्यता असल्याचे मत आरोग्य विभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
देशभरात करोनाची दुसरी लाट वेगाने पसरली असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात 30 ते 45 वर्षे वयोगटातील तरुण बाधित झाले आहेत. एवढेच नव्हे, तर केवळ साधी लक्षणे नव्हे तर या लाटेचे गंभीर परिणाम झाले असून, रुग्ण व्हेंटिलेटरवर जाण्याचे आणि मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
रुग्ण गंभीर झाल्यानंतरही डॉक्टरांकडून उपचारासाठी “रेमडेसिविर’ इंजेक्शनचा वापर होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. या इंजेक्शनची मागणी अचानकच वाढल्याने उत्पादन आणि पुरवठा याचा समतोल साधणे अवघड झाले आहे. त्यातून रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू झाली असून, त्यातून अनेक बेकायदेशीर प्रकारही वाढले आहेत.
एवढेच नव्हे तर या रेमडेसिविर इंजेक्शनवरून राजकारणाचा कलगीतुराही रंगला आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांची त्याचे वितरण आपल्या अखत्यारित घेतले. ही सगळी परिस्थिती पाहता राज्य सरकारने करोना विरोधातील लढ्यासाठी स्थापन केलेल्या “टास्क फोर्स’ने शनिवारी राज्यातील महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महत्वाच्या विभागांच्या सचिवांची ऑनलाइन बैठक घेतली.
या बैठकीमध्ये रेमडेसिविरचा वापर कोणत्या स्थितीत करावा, कोणत्या रुग्णांना हे इंजेक्शन द्यावे, इंजेक्शनची उपयुक्तता आदीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. “एचआरसीटी स्कोअर’ हा 10 ते 12 च्या पुढे गेल्यास किंवा रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यास त्याला रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. राज्य सरकारकडून येत्या एक दोन दिवसांत या सूचनांच्या आधारे रेमडेसिविर इंजेक्शन देण्याबाबत नव्याने गाइडलाइन काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिली.