दिलासादायक! पुणे जिल्ह्यातील 444 गावांमधून करोना ‘हद्दपार’; सक्रिय रुग्णांचे प्रमाण ‘शुन्य’

पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात या संसर्गाने कहर माजविला असून, एकीकडे वाढती संख्या चिंता व्यक्‍त करत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील 444 गावांमधून करोना सध्या हद्दपर झाला आहे. या गावांत सक्रिय रुग्णांचे प्रमाण शुन्य आहे.

जिल्ह्यातील 1 हजार 404 ग्रामपंचायतींपैकी 444 गावे करोनामुक्‍त झाल्याने एकूण गावांपैकी हे प्रमाण 31.62 टक्‍के एवढे प्रमाण आहे. त्यामध्ये भोर तालुक्‍यातील सर्वाधिक 101 गावांचा समावेश आहे. सर्वाधिक कमी शिरूर तालुक्‍यातील 10 गावांमधील रुग्णांची संख्या शून्य झाली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांमध्ये हॉटस्पॉट गावांमधील करोना नियंत्रणात आणण्यासाठी त्याठिकाणी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्षात गावपातळीवर नागरिक करोनाविषयी किती गंभीरपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहेत. हे पाहून त्याठिकाणी आणखी काय उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये गावांमध्ये झपाट्याने वाढ होणाऱ्या करोनाला 444 गावांमध्ये सध्यातरी एकही सक्रिय रुग्ण नाही. त्यामुळे करोनाला रोखण्यात यश येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी गावे करोनामुक्‍त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून उपाययोजना राबवून त्याची गावांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या आंबेगाव तालुक्‍यात 19, बारामतीमध्ये 16, भोर येथे 101, दौंड तालुक्‍यात 12, हवेलीतील 22, इंदापूरमधील 27, जुन्नर येथील 11, खेडमधील 62, मावळ येथील 62, मुळशीमधील 24, पुरंदरयेथील 22, शिरूर येथील 10 तर वेल्हा येथील 56 गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 1 हजार 404 ग्रामपंचायतींपैकी सुमारे चारशे गावांमध्ये यापूर्वी करोनाचे रुग्ण काही प्रमाणात आढळले होते. मात्र, आता त्या गावांमध्ये एकही सक्रिय रुग्ण आढळला नाही ही सकारात्मक बाब समोर आली आहे. म्हणजेच जिल्ह्यातील 31 टक्‍के गावांमध्ये आता सक्रिय रुग्ण नाही, हे स्पष्ट झाले आहे.

  • आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.