मिलान (इटली) – बिजिंग, चीनहून इटलीतील मिलान शहरात जाणाऱ्या विमानातील निम्म्या प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे चीनमधून इतर देशांमध्ये करोना पसरण्याचा धोका आणखी वाढला आहे. या कारणास्तव भारत आणि अमेरिकेसह सात देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक केले आहे.
चीनहून मिलानला जाणाऱ्या दोन फ्लाइटमध्ये प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका फ्लाइटमधील 92 प्रवाशांपैकी 35 म्हणजे 38 टक्के आणि दुसऱ्या फ्लाइटच्या 120 प्रवाशांपैकी 62 म्हणजेच 52 टक्के प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे, देशात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण असूनही चीन निर्बंध शिथिल करत आहे. नवीन वर्षात कोविडच्या धोक्याची पातळी ‘A’ वरून ‘B’ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोना रुग्णाला क्वारंटाईन करण्याची गरज भासणार नाही.
चीनने पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या चिनी चंद्र नववर्षाच्या सुट्टीत परदेशात प्रवास करू इच्छिणाऱ्या लोकांना लाखो सामान्य पासपोर्ट आणि व्हिसा जारी करणार असल्याचेही जाहीर केले आहे. यामुळे जगभरात कोविडचा नव्याने उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. करोनामुळे चीन जवळजवळ तीन वर्षे संपूर्ण जगापासून तुटला होता, कारण बहुतेक देशांनी प्रवासी निर्बंध लादले होते. त्यामुळे तो आपल्या पर्यटकांच्या परदेश दौऱ्यांवरील निर्बंध उठवत आहे. 2020 नंतर प्रथमच चीन ही सूट देत आहे, मात्र जगभरात कोविडच्या दृष्टिकोनातून हे पाऊल चिंताजनक मानले जात आहे.
चीनमधून प्रवाशांचे तिकीट बुकिंग वाढले आहे. दुसरीकडे, ट्रिप डॉट कॉम अशा ट्रॅव्हल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, चीनने शिथिल केल्यानंतर आंतरराष्ट्रीय तिकीट बुकिंग आणि चिनी प्रवाशांच्या संबंधित शोधांमध्ये पाच ते आठ पट वाढ झाली आहे. चिनी लोकांनी जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, यूएसए, यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रवास करण्यास उत्सुक आहेत.
चीनमध्ये वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्यांसाठी ही तपासणी आवश्यक असेल. भारतात आल्यावर, या देशांतील कोणत्याही प्रवाशाला ज्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली किंवा कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले तर त्याला क्वारंटाईन केले जाईल. त्याचप्रमाणे अमेरिका, जपान, मलेशिया यांनीही चीनमधून येणाऱ्यांसाठी कोविड निगेटिव्ह चाचणी अनिवार्य केली आहे.