पुणे – देशात करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. या लाटेचा अधिक फटका महानगरांना बसला आहे. यामध्ये पुणे,मुंबई दिल्ली सारख्या शहरांचा समावेश आहे. दरम्यान या महानरामधूनच करोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे. नुकत्याच एका अभ्यासाद्वारे देशात करोना पसरविणाऱ्या 10 शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एजुकेशन अँड रिसर्चने याबाबत माहिती मिळवीली आहे. या टॉप-10 शहरांच्या यादीमध्ये दिल्ली प्रथम, मुंबई द्वितीय स्थानावर तर पुणे शहराचा 10 व्या क्रमांकावर समावेश आहे.
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एजुकेशन अँड रिसर्चने (IISER) ज्या शहरांत कोरोना महामारी वेगाने पसरण्याचा धोका असतो, त्या शहरांसंदर्भात एक मॅप तयार केला आहे. IISER च्या या अभ्यासात दिल्ली अव्वल स्थानावर आहे. दिल्लीनंतर, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. तर या यादीत पुणे 10व्या क्रमांकावर आहे. IISERने आपल्या या मॅपमध्ये एक लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण 446 शहरांना स्थान दिले आहे.
या शहरांत ट्रांस्पोर्ट व्यवस्था मोठी असल्याने अनेक ठिकाणांना जोडली गेलेली असते. यामुळे व्हायरसचे संक्रमण बाहेरही पसरू शकते. असे IISER च्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
IISER चे संशोधक, एमएस सन्थानम म्हणाले की, “व्हायरस किती घात आहे आणि तो सर्वप्रथम कोठे पसरला? यावर व्हायरसचा प्रसार कमी अवलंबून असतो. तर, त्या शहरातील ट्रांस्पोर्ट मोडवर तो अधिक अवलंबून असतो. कारण यामुळे हे संक्रमण दूरवर पसरते. IISER ने आपल्या या प्रोजेक्टमध्ये मोबिलिटी आणि ट्रांस्पोर्ट डाटाचाही वापर केला आहे. यानुसार, एखाद्या दुसऱ्या शहरात महामारी पसरल्यास, या शहरांना किती धोका होईल, या आधारे त्यांना स्कोर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जर पुण्यात महामारी पसरली, तर मुंबई संक्रमण प्रसाराच्या यादीत सर्वात पुढे असेल. याबाबतीत महाराष्ट्रातील सातारा शहर 19व्या आणि लातूर 50 व्या स्थानावर असेल.
“हे अत्यंत सोप्या सिद्धांतावर काम करते. लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करणे संक्रमाच्या प्रसाराला जबाबदार असते. आपण लोकांच्या रोजच्या प्रवासासंदर्भात माहिती मिळवल्यास या संक्रमणाच्या प्रसाराची भौगोलिक स्थिती समजू शकतो.” असे मॅपमागील विज्ञानावर बोलताना IISER टीमचे सदस्य ओंकार सादेकर म्हणाले आहेत.आणखी एक सदस्य सचिन जैन यांनी म्हटले आहे, की “जर एका शहरात एखादा संक्रामक आजार आला, तर तो दुसऱ्या शहरात पसरायला किती वेळ लागेल, या वेळेची माहिती मिळवून आपण वेगवेगळ्या शहरांना रँक देऊ शकतो.”