#coronavirus : रुग्ण गंभीर, हतबल नातेवाईक आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास

मोठ्या शहरांतील रुग्णांची बेडच्या शोधात छोट्या शहरांतील रुग्णालयात धाव

नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील अनेक शहरांमध्ये रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आणि मग नातेवाईकांनी रुग्णाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. 

अनेकांनी तर रुग्णांसाठी बेड उपलब्ध आहे म्हटल्यावर मोठ्या शहरांतून छोट्या शहरांकडे धाव घेतली. अनेकदा कुठलाही मार्ग दिसत नाही म्हटल्यावर दुसऱ्या राज्यात जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला. रुग्णावाहिकेसाठी हजारो रूपये मोजले.

नागपूरचा अभिमन्यू पागडे हा सर्वसामान्य कुटुंबातील 22 वर्षांचा तरूण आयटी कंपनीत नोकरी करतो. त्याचे वडील रमेश पागडे भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. करोनामुळे त्यांची स्थिती गंभीर झाल्यानंतर नागपूरमधील एकाही रुग्णालयात बेड न मिळाल्याने अभिमन्यूने सात एप्रिलच्या रात्री नागपूरहून रुग्णवाहिकेतून प्रवास सुरु केला आणि तब्बल 460 किलोमीटरचे अंतर कापून आठ एप्रिलला सकाळी आंध्र प्रदेशातील वारंगळ येथे पोचला आणि आधीच राखून ठेवलेल्या तेथील रुग्णालयात त्यांना दाखल केले.

त्याच्या वडिलांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यांची ऑक्सिजन पातळी 71 पर्यंत घसरली होती. अभिमन्यूने नागपुरातील सगळ्या रुग्णालायात फोन करून चौकशी केली. परंतु एकाही ठिकाणी बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर त्याचे काका वारंगळ येथे रहात असल्याने त्याने त्यांना फोन केल्यावर वारंगळमधील रुग्णालयात सोय झाली. त्यासाठी त्याच्या वडिलांनी नागपूरहून लाईफ सपोर्टिंग सिस्टिम असणाऱ्या रुग्णवाहिकेतून न्यावे लागले.

देशातील मोठी शहरे करोनाच्या विळख्यात सापडल्याने अनेकांनी बेड़ मिळण्याच्या आशेने छोट्या आणि मध्यम शहरांचा मार्ग निवडला. विशेषतः आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्यांनी दूर अंतरावरील शहरातील रुग्णालयात सोय होऊ शकते हे समजल्यावर तिकडे धाव घेतली. त्यासाठी रुग्णवाहिकेतून शेकडो किलोमीटरचा प्रवास केला.

रुग्णवाहिका सेवेतील देशातील प्रमुख कंपनी असणाऱ्या स्टॅनप्लसचे सीईओ आणि संस्थापक प्रभदीपसिंग यांच्या सांगण्यानुसार सध्या रुग्णाला बेड मिळण्यासाठी रुग्णवाहिकेतून लांब अंतराचा प्रवास करणे हे अगदी सामान्य होऊन गेले आहे. विशेषतः दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) तर अनेकांनी राजस्थान, हरयाना अगदी पंजाबमधील भटिंड्यापर्यंत रुग्णालयासाठी मजल मारली.

दिल्लीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ऑक्सिजन बेड व अन्य सुविधांवर मोठा ताण आला. त्यामुळे स्टॅनप्लसक़डे रोड हरियानातील झज्जर, पानीपमत, सोनिपत, पंचकुला, पंजाबमधील अमृतसर येथे रुग्णाला नेण्यासाठी फोन येत आहेत. प्रभदीपसिंग म्हणतात, आधी छोट्या शहरांमधील रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी मोठ्या शहरांमधील रुग्णालयात दाखल केले जायचे. आता परिस्थिती वेगळी आहे. मोठ्या शहरातील रुग्ण आणि नातेवाईक रुग्णालयाच्या शोधात छोट्या शहरांकडे धाव घेताना दिसत आहेत.

दिल्लीतील मयंक गर्ग मूळचा पंजाबमधील भटिंडाचा. त्याचा जवळचा मित्र राहुलने त्याला गेल्या आठवड्यात रात्री अचानक फोन केला आणि करोनामुळे आईची तब्येत अतिशय खालावली असल्याचे आणि ऑक्सिजन लेवल 85 पर्यंत उतरल्याचे सांगितले. दिल्लीत कुठेही बेड मिळत नसल्याचे सांगून त्याने काहीतरी करण्यास सांगितले. त्यावर मयंकने भटिंडातील रुग्णालयात सोय केली. मग तिघेही कारमध्ये आईला ऑक्सिजन सिलेंडर लावून 300 किलोमीटरचा प्रवास करून भटिंड्यातील रुग्णालयात पोचले.

अशा कठीण प्रसंगात मदतीसाठी अनेकांनी हेल्पलाईन सुरु केल्या, सपोर्ट ग्रुप सुरु केले. स्वयंसेवी संस्थेद्वारे हे काम करणाऱ्या हरियानातील गुरुग्राममधील विभा पांडे म्हणतात, इथे बेड मिळत नसल्याने मी अनेकांना पतौडी, रोहतक, सोनिपत येथील रुग्णालयामध्ये पाठवले. पण कमी अंतरासाठीदेखील अनेक रुग्णवाहिकाचालकांनी 70 हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांकडे कुठलाही पर्याय नसल्याने ते हतबल ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.