बॅंकॉक – थायलंडमध्ये पुन्हा करोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढल्याने तेथे पुन्हा बहुतांशी प्रांतात नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तेथे सध्या रोज दहा हजार रुग्ण आढळून येत असल्याने पुन्हा बहुतांशी भागात गर्दी टाळण्यासाठीचे निर्बंधही लागू केले जात आहेत. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसाय पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
थायलंडमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. तेथे केवळ पाच टक्के लोकसंख्येला करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले असून 15 टक्के लोकांना प्रत्येकी एक डोस देण्यात आला आहे. लसींचा अभाव हे लसीकरण कमी असण्याचे एक कारण सांगितले जात आहे.
बॅंकॉक शहरात करोना वाढण्याचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. ऍस्ट्रा झेनका लस थायलंडमध्येच तयार केली जात आहे. पण त्याचे उत्पादन मात्र अपेक्षेच्या तुलनेत खूपच कमी असल्याने त्या लसींच्या निर्यातील थायलंड सरकारने बंदी घातली आहे.