Corona virus: चीनहून आलेल्या प्रवाशांच्या प्रकृतीची होणार विचारपूस

राज्य साथरोग नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: करोना व्हायरस आजाराच्या अनुषंगाने राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक आज येथे घेण्यात आली. निरीक्षणाखाली रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले. चीन आणि विशेषकरून वुआन प्रांतातून आलेल्या राज्यातील रहिवाशी प्रवाशांना संपर्क करुन त्यांच्या प्रकृतीची विचारणा करणे, आदीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

येथील जी.टी. रुग्णालयातील सभागृहात सकाळी बैठक झाली. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते.

रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असलेल्या ज्या तीन रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत त्यांचे पुन्हा चार दिवसांनी नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवावे, दुसरा नमुनाही ‘निगेटिव्ह’ आला तर त्या रुग्णाला डिस्चार्ज द्यावा. त्याने घरी राहून किमान आठवडाभराची विश्रांती घ्यायचा सल्ला देण्यात यावा. समजा एखाद्या रुग्णाचा पहिला नमुना ‘पॉझिटिव्ह’ आला  आणि दुसरा ‘निगेटिव्ह’ आला तर अशा रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करावे, असे करोनासाठी तपासणी केलेल्या रुग्णांच्या बाबतीत डिस्चार्ज धोरण यावेळी ठरविण्यात आले.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दि. 18 जानेवारीपासून थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यरत आहे.कालपर्यंत सुमारे 2600 प्रवाशांची तपासणी त्याद्वारे करण्यात आली.

मात्र चीन आणि विशेष करुन वुआन प्रांतातून जर कोणी प्रवासी दि. 18 जानेवारी पूर्वी मुंबईत दाखल झाला असेल अशा दि. 1 जानेवारी पासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येईल. त्यातील महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येऊन त्यांना सर्दी, ताप वा तत्सम लक्षणे आढळली आहेत का ? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का याबाबत विचारणा करावी. असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संपर्क साधतील तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरुन संपर्क साधतील.

महाराष्ट्रात आजमितीस करोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्यास तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्व तयारी केली आहे. ‘करोना’ रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र खासगी रुग्णालय निवडीसाठी निकष करण्यात येत असून त्यानुसार त्यांची निवड करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.

ज्या रुग्णालयांचा समावेश ‘करोना’ रुग्णांच्या उपचारासाठी आहे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात यावेत अशी सूचना यावेळी करण्यात आली.

खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील ‘करोना’बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येतील. ‘करोना’सारख्या आजाराचे लक्षण असलेल्या रुग्णांवर काय उपचार करावेत याबाबत सूचना तज्ज्ञांमार्फत तयार करण्यात येत आहे. त्या लवकरच खासगी डॉक्टरांना पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला.

‘करोना’ संदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्यात येणार असून 104 क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. सध्या प्रवाशांची तपासणी करताना चीनच्या वुआन प्रातांतून आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे, असाही निर्णय यावेळी झाला.

बैठकीस आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, डॉ. प्रदीप आवटे, एनआयव्हीचे तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here