CoronaVaccine : केंद्र सरकार उपलब्ध करणार लसींचे 2 कोटी डोस

नवी दिल्ली – केंद्र सरकार पुढील पंधरवड्यात (16 ते 31 मे) सुमारे 192 लाख म्हणजेच जवळपास 2 कोटी लसींचे डोस उपलब्ध करणार आहे. ते डोस राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत वितरीत केले जातील.

मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून लसींचे 1.7 कोटी मोफत डोस पुरवण्यात आले. आता पुढील पंधरवड्यात होणाऱ्या वितरणाची तयारी सरकारने केली आहे. त्यानुसार, कोविशिल्ड लसीचे 1 कोटी 62 लाख, तर कोव्हॅक्‍सिन लसीचे सुमारे 30 लाख डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील.

चालू महिन्यात राज्यांना आणि खासगी रूग्णालयांना थेट खरेदीसाठी लसींचे 4 कोटी 39 लाख डोस उपलब्ध असल्याची माहितीही केंद्राकडून देण्यात आली. देशात आतापर्यंत नागरिकांना लसींचे सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत.

भारताने सर्वांत जलद लसीकरण मोहीम राबवताना अवघ्या 114 दिवसांत 17 कोटी डोसचा पल्ला गाठला. त्यासाठी अमेरिकेला 115 दिवसांचा, तर चीनला 119 दिवसांचा कालावधी लागला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.