CoronaVaccine : श्रीमंत राष्ट्रांचाच लसींवर कब्जा; गरीब देश चिंतेत

जिनेव्हा – जगभरातील करोना लशीवर श्रीमंत देशांनी ताबा मिळवल्याची परिस्थिती असून गरीब देशांकडे लस नसल्याचे चित्र आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस आवश्‍यक असताना गरीब देशांकडे लस नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस गेब्रायसेस यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, जगातील करोना लशींपैकी केवळ 0.3 टक्के लशी गरीब देशांपर्यंत पोहचल्या आहेत. तर श्रीमंत देशांमध्ये 82 टक्के लस पोहचली आहे. जगभरात एक अब्जाहून अधिक करोना लस डोस आहेत. त्यापैकीच 82 टक्के लस या श्रीमंत आणि उच्च उत्पन्न गटातील देशांकडे आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने या आधीदेखील लस साठ्यावरून चिंता व्यक्त केली होती. अनेक श्रीमंत आणि उच्च उत्पन्न गटातील देशांनी मोठ्या प्रमाणावर लशींची नोंदणी फार्मा कंपन्यांकडे केली होती. काही देशांनी आपल्या लोकसंख्येपेक्षाही अधिक लस नोंदणी केल्यामुळे इतर विकसनशील आणि गरीब देशांसमोर लसीकरणाची चिंता निर्माण झाली होती. या देशांना जागतिक आरोग्य संघटनेवर अवलंबून राहावे लागले आहे.

दरम्यान, भारताने 80 हून अधिक देशांना आतापर्यंत लशींचा पुरवठा केला असून, दीडशेहून अधिक देशांना अत्यावश्‍यक वैद्यकीय साहित्य पुरवले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) गुरुवारी भारताकडून देण्यात आली. भारताला संसाधनांची मर्यादा तीव्र जाणवत असतानाही जगभरामध्ये लस समानता राहावी, यासाठी भारताने आपली भूमिका उदार ठेवली असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.