मुंबई – करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललं आहे. मात्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण 1 मे पासून सुरू करता येणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. आता त्यांनी 1 मे पासून लसीकरण सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत.
राजेश टोपे यांनी 1 मे पासून अर्थात उद्यापासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.
1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं, असंही ते म्हणाले.
सिरम इन्टिट्यूटने सांगितलं की मे महिन्यात 13 ते 14 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देऊ. तर भारत बायोटेक कोवॅक्सिनचे चार ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज 18 लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीनं 18 ते 44 वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करता येऊ शकेल. मात्र केंद्र कमी ठेवल्याने लसीकरण जास्त कालावधीसाठी सरू राहिल असंही ते म्हणाले.