तिरुअनंतपूरम – बहुतांश राज्ये अनलॉक होत असताना केरळ आणि उत्तराखंडमधील लॉकडाऊन मात्र वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ती राज्ये आणखी आठवडाभरासाठी लॉक राहतील.
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केरळमध्ये 8 मेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली. आता मुदतवाढ मिळालेला लॉकडाऊन 9 जून या दिवशी संपणार होता. मात्र, केरळमध्ये नव्या करोनाबाधितांची दैनंदिन संख्या घटत असली तरी अद्याप 10 हजारांच्या आसपास आहे.
त्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील लॉकडाऊनची मुदत 16 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. अखेरचे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन लागू असेल. दरम्यान, उत्तराखंडमधील लॉकडाऊनही 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्या राज्यातील ग्रामीण भागात सवलती देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनांवर सोपवण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार गावी परतत आहेत. त्यांना सात दिवस स्थानिक विलगीकरण कक्षात घालवूनच घरी जाता येणार आहे. उत्तराखंडमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना ठराविक कालावधीसाठी खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.