CoronaUpdate : कुंभमेळ्यातील करोना संसर्गावरून साधुंच्या आखाड्यातच आरोप-प्रत्यारोप

हरिद्वार – येथे सध्या सुरू असलेला कुंभमेळा करोनाच्या कचाट्यात सापडला आहे. हा करोना कोणामुळे पसरला या मुद्‌द्‌यावरून साधूंच्या आखाड्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झाले आहे. संन्याशी आखाड्यामुळेच हरिद्वारमध्ये करोना पसरल्याचा आरोप बैरागी आखाड्याने केला आहे. या आधी हा ठपका बैरागी आखाड्यावर ठेवण्यात आला होता. तथापि बैरागी आखाड्याने हा आरोप फेटाळून लावला आहे.

या गोंधळातच निर्मोही आखाड्याचे प्रमुख महंत राजेंद्र दास यांनी म्हटले आहे की, हरिद्वार मध्ये पसरलेल्या करोनाला आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हेच जबाबदार आहेत.
दरम्यान निरंजनी आखाड्याने आमच्यासाठी हा कुंभमेळा आता संपला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि त्यांच्या घोषणेलाही अन्य आखाड्यांनी आक्षेप घेतला असून कुंभमेळ्याविषयी एकट्यादुकट्या आखाड्याला परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही असे अन्य आखाड्यांच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे असंख्य साधू आणि भाविक जमले आहेत. त्यातील साधुच करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंभमेळ्याच्या ठिकाणी कोणतेच करोना विषयक निर्बंध लागू नाहीत. असे निर्बंध लागू केले तर उपस्थितांमध्ये असंतोष पसरेल असे कारण देत सरकारने तेथे हे निर्बंध लागू करण्यास असमर्थता दर्शवली होती. याचा परिणाम असा झाला आहे की हरिद्वार मध्ये सुमारे 20 हजाराहून अधिक लोक करोनाग्रस्त झाले असल्याचे आढळून आले आहे. जुना निरंजनी आखाडा आणि आव्हान आखाड्याचे अनेक साधु करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आल्याने या एकूणच प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात आलेले भाविक आता झपाट्याने आपआपल्या गावी परतु लागल्याचेही दृष्य येथे पहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.