करोनाची तिसरी लाट अन् सरकारची तयारी; ‘या’ ५० ठिकाणी मॉड्युलर हॉस्पिटल उभारणार

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने आतापर्यंत हैदोस घातला होता. मात्र आता दुसऱ्या लाटेतीळ रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र असे असले तरी देशाला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात केंद्राकडून मोठी तयारी सुरु करण्यात आली आहे. सरकारने पुढच्या दोन-तीन महिन्यांत देशातील विविध भागात ५० इनोव्हेटिव्ह मॉड्युलर रुग्णालये उभारण्याची तयारी केली आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार सध्या असलेल्या रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी ही मॉड्युलर रुग्णालये सध्या असलेल्या रुग्णालयांच्या बाजूला पायाभूत सुविधांच्या विस्तारित रूपात तयार केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूसोबत १०० बेडसह अशी ५० मॉड्युलर रुग्णालये तयार केली जातील. तीन आठवड्यात उभारणी होणाऱ्या या रुग्णालयांना बनवण्यासाठी ३ कोटी रुपये एवढा अंदाजित खर्च येईल. तर ६-७ आठवड्यात ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होतील.

पहिल्या टप्प्यात बिलासपूर, अमरावती, पुणे, जालना आणि मोहाली येथे १०० बेड मॉड्युलर रुग्णालये बनतील. रायपूर येथे २० बेड असलेले रुग्णालय बनेल. तर बंगळुरू येथे २०, ५० आणि १०० बेडचे एक एक रुग्णालय तयार होईल.ही रुग्णालये २५ वर्षांपर्यंत कार्यरत राहतील. या रुग्णालयांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती एका आठवड्याच्या आत गुंडाळून अन्य कुठल्याही ठिकाणी नेता येतील.

देशातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यावर रुग्णालयातील पायाभूत सुविधांवर खूप दबाव आला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत अभिनव मॉड्युलर रुग्णालय दिलासा घेऊन आले आहे. मॉड्युलर रुग्णालय हे रुग्णालयाच्या पायाभूत रचनेचा विस्तार असेल. ते रुग्णालयाच्या जवळ बनवता येऊ शकेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.