करोनाचे ‘वशीकरण’; कमला नेहरू रुग्णालयातून लसीकरण मोहिमेचा आरंभ

पुणे – महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात शनिवार सकाळी अकरा वाजता करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर नोंदणीकृत लाभार्थींना लस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नोंदणी नसलेल्या लाभार्थींनी केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पहिल्या दिवशी आठ लसीकरण केंद्रांवर एकूण 500 जणांना लस दिली जाणार आहे. “को-विन ऍप’मध्ये नोंदणीकृत लाभार्थ्यांमधून “रॅंडमायझेशन’ पद्धतीने लाभार्थीची निवड केली जाणार आहे. नारायण पेठेतील मुख्य लसीकरण कार्यालयात लसींचा साठा करण्यात आला असून, तेथून केंद्रांवर लसींचे वितरण केले जाणार आहे.

लसीकरण केंद्रांवर तीन खोल्या आहेत. पहिल्या खोलीत प्रतिक्षा कक्षात नोंदणीकृत लाभार्थींसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ओळखपत्र तपासून पडताळणी केली जाणार आहे. दुसऱ्या खोलीत लसीकरण कक्षात लाभार्थींना लस दिल्यानंतर त्यांची नोंदणी को-विन सॉफ्टवेअरमध्ये केली जाणार आहे. तिसऱ्या खोलीत निरीक्षण कक्षात लस घेतलेल्या लाभार्थींना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव उपस्थित होते.

22 हजार लाभार्थींना डोस
करोनारोधक लस घेण्यासाठी शहरातील 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालिकेमार्फत कोविन ऍपवर नोंदणी केली आहे. त्यामध्ये सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 11 हजार 500 आहे. महापालिकेकडे लसीचे 48 हजार डोसेस उपलब्ध आहेत. 10 टक्के वेस्टेज वगळता अंदाजे 22 हजार लाभार्थ्यांना लसींचे दोन डोस दिले जाणार आहेत.

शहरातील लसीकरण केंद्र
– कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
– ससून रुग्णालय, पुणे स्टेशन
– स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
– कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह, कोथरूड
– दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा
– रुबी हॉल क्‍लिनिक, ताडीवाला रस्ता
– नोबल हॉस्पिटल, हडपसर
– भारती हॉस्पिटल, धनकवडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.