पणजी – देशातील करोनाबाधित उच्चपदस्थांमध्ये आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भर पडली आहे. स्वत: 47 वर्षीय सावंत यांनी ट्विटरवरून त्यांच्या करोनाविषयक चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
करोना लागणीशी संबंधित लक्षणे न आढळल्याने त्यांनी घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. सावंत यांनी मागील काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचण्या करून घेण्याचे आणि सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सावंत यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक देखरेख ठेऊन आहे. गरज भासली तरच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात येईल, असे समजते.
सावंत आता घरातूनच त्यांचे कामकाज सांभाळणार आहेत. त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही घरांमध्ये विलगीकरणात राहून कामकाज पाहण्यास सांगण्यात आले आहे.