जनरल वॉर्डच्या मजल्यावरुन काच फोडत घेतली उडी
उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू
नगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील शिरूर येथील गोरक्ष महादेव मतकर या तरुणाने रुग्णालयातील जनरल वॉर्डच्या मजल्यावरील खिडकीची काच फोडून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गुलमोहर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये ही दुर्देवी घटना घडली.
दरम्यान, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरभी हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित रुग्णाचा दहा दिवसांपूर्वी करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर पाथर्डी तालुक्यातील शिरूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, तेथे अपेक्षित उपचार होत नसल्याने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या नातेवाईकांनी त्याला येथील सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, आज पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश गांधी यांनीच या संदर्भात तोफखाना पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी येथील गोरक्ष मतकर हा तरुण करोनाबाधित असल्याने 24 ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. ऍडमिट करुन घेत त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले होते. मात्र, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने उठून बाथरूमजवळ असलेल्या फरशी पुसण्याच्या दोरीच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य होत नसल्याचे लक्षात आल्याने त्याने पळत जाऊन काचेची खिडकी फोडून इमारतीखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
डॉ. राकेश गांधी,वैद्यकीय संचालक, सुरभी हॉस्पिटल, नगर.