मुंबई – राज्यावर करोना संकट पुन्हा गडद होऊ लागले असून लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात दिग्गज नेते, कलाकार आदी करोनाच्या विळख्यात अडकत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी आणि सुपुत्र आदित्य यांना करोनाची लागण झाली आहे. तर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याही घरात करोनाचा शिरकाव झाला आहे.
वर्षा राऊत यांना मागील दोन दिवसांपासून ताप, सर्दी खोकला होता. करोनाची लक्षणे असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी करोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्षा राऊत यांची करोना पॉझिटिव्ह आल्याने संजय राऊत यांनाही चाचणी करावी लागणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर वर्षा राऊत पॉझिटिव्ह आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढली आहे.