सूरत – गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने त्याला करोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर आत्महत्या केली आहे. कुमारपाल शहा असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते 63 वर्षांचे होते. त्यांना करोना झाल्याचे गुरूवारी निष्पन्न झाल्यानंतर ते अस्वस्थ झाले होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या स्कूटरवरून बाहेर निघाले आणि नंतर त्यांनी उधना रेल्वे स्थानकावर जाऊन धावत्या रेल्वे गाडीपुढे स्वताला झोकून दिले.
आपल्याला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने आत्महत्या करीत आहोत असे त्यांनी आपल्या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. त्यांच्या शर्टाच्या खिशात ही नोट सापडली. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. तथापि, त्यांच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे काय याचीही पोलीस शहानिशा करीत आहेत.