राज्यात आतापर्यंत 11 जण करोनाबाधित
मुंबई : जगभरात हाहाकार माजवलेल्या करोनाने भारतात शिरकाव केला आहे. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 67 वर पोहोचली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा रुग्ण आहे. पुण्यात आठ, मुंबईत दोन रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक करोनाबाधित रुग्ण सापडला आहे. अशाप्रकारे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे.
अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. बुधवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. तरी, अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कोणाकोणाच्या संपर्कात आली याचा शोध घेणे सुरु आहे. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
नागपुरातील अकरा संशयित रुग्णांपैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांचे अहवाल आलेले नाहीत. बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अहवाल प्राप्त झाला असून यात एकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीचे वय 45 ते 50 च्या दरम्यान असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जगभरात करोनाचे 1 लाख 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यापैकी 4 हजार 633 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 68 हजार 286 जण यातून बरे झाले आहेत.