पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहरात सलग चार दिवसांपासून करोनाने हाहाकार निर्माण केला आहे. काल (शनिवारी) एकाच दिवसात तब्बल 50 रुग्णांना बाधा झाल्यानंतर आज (रविवार) पुन्हा नव्याने 49 जणांना करोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 42 जणांचा समावेश असून शहराबाहेरील 7 जणांचा समावेश आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 354 वर पोहोचली असून ही आकडेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आहे.
पिंपरी-चिंचवड शहर गुरुवारपासून कंपन्यांसह लघुउद्योग व व्यवसाय, बाजापेठा खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही अटी व शर्ती लागू करून ही परवानगी देण्यात आली होती. मात्र नागरिकांनी सर्वच नियम पायदळी तुडवत बाजारपेठांसह रस्त्यावर गर्दी केल्यामुळे रुग्णांची संख्या गेल्या चार दिवसांत दीडशेच्या आसपास पोहोचली आहे. अचानकपणे वाढलेल्या रुग्णांमुळे शहरात हाहाकार उडाला आहे तर सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी 377 संशयीतांचे अहवाल प्रतिक्षेत होते. त्यापैकी काहीजणांचे अहवाल सकाळी साडेअकरावाजता आले. तर काहीजणांचे अहवाल दुपारी साडेपाच वाजता आले. सकाळी आलेल्या अहवालामध्ये चारजणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये भोसरीतील एका पुरुषाचा समावेश होता. तर वारजे आणि जुन्नर येथील एका पुरुषाचा व दोन महिलांचा समावेश होता. दुपारी साडेपाच वाजता आलेल्या अहवालानुसार तब्बल 45 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये शहरातील 41 जण तर शहराबाहेरील चार पुरुष हे देहूरोड, जुन्नर आणि आंबेगाव येथील आहेत.
तर शहरातील आनंदनगर (चिंचवड), सांगवी व थेरगाव येथील आहेत. यामध्ये 30 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. आज आज दिवसभरात एकजण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही 170 झाली आहे.