जुन्नर (वार्ताहर)- जुन्नर शहरात करोनाचा आणखी एक बळी गेला असून शहरातील करोनाबळींची संख्या ३ तर तालुक्यातील संख्या ८ झाली आहे. पिंपरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान या व्यक्तीचा मंगळवारी (दि. २१) सकाळी मृत्यू झाला आहे. सदर पन्नाशीतील व्यक्तीला काही दिवसांपासून त्रास जाणवत होता. मात्र त्रास वाढल्यावर त्यांना चार दिवसांपूर्वी पिंपरी येथे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान गेल्या आठवड्यातील करोनाचा हा शहरातील तिसरा बळी असून शहरासाठी ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने मंगळवारपासून (दि. २१) केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवहारासाठी काही काळासाठी सूट दिली आहे. मात्र नागरिकांनी नियम व अटींचे पालन न केल्यास आकडा वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी तालुक्यात केवळ तीन बाधित आढळल्याचा रिपोर्ट आला होता. मात्र शनिवार, रविवार आणि सोमवारचे लेण्याद्री येथे जमा करण्यात आलेल्या स्वॅब चाचण्यांचे काही रिपोर्ट्स सुट्ट्या व इतर कारणांमुळे प्रलंबित असल्याचे समजत आहे.