शिक्रापूर (प्रतिनिधी) – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे मार्चमध्ये एका करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच जुलै महिन्यात एका इसामचा करोनाने मृत्यू झालेला असताना आता पुन्हा तळेगाव ढमढेरे येथे तिसरा बळी गेला आहे. एका 45 वर्षीय करोना बाधित इसमाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सदर इसम आजारी असल्याने त्या इसमावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर सदर इसमामध्ये करोनाची काही लक्षणे आढळून आल्यानंतर सदर इसमावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. त्या ठिकाणी सदर इसमाची करोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर दरम्यान सदर इसमाची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करत सदर करोना बाधित इसमावर पुणे येथे उपचार सुरु करण्यात आले होते.
उपचार सुरु असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास सदर करोना बाधित इसमाचा मृत्यू झाला असून तळेगाव ढमढेरेत करोनाचा तिसरा बळी गेला आहे. तर यापूर्वी तळेगाव ढमढेरे येथे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात होती. तरीही एका इसमाला करोनाची बाधा होऊन त्याच्या घरातील काही व्यक्ती बाधित झाले. त्याच घरातील एका महिलेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.