जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा वेगाने वाढत असून शुक्रवारी (दि. १६) सकाळी करोनाने तालुक्यातील सहावा बळी घेतला आहे. वारूळवाडी येथील ह्या व्यक्तीची गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाविरुद्ध सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. तर गुरुवारी जुन्नर शहरातील आणि बुधवारी पिंपळगाव येथील कोरोनाबधिताचा बळी गेल्यामुळे सलग 3 दिवसांत 3 बळी घेऊन कोरोनाने हॅटट्रिक साधली आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. १६) रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट्सनुसार एकाच दिवसात २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही तालुक्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी एका दिवसातील आकडेवारी आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण संख्या २३९ इतकी झाली असून गेल्या पाच दिवसांत तब्बल ९० रुग्ण आढळून आले आहेत. आता मात्र नागरिकांनी काळजी न घेतल्यास मोठी आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्याने आढळून आलेल्या या २७ रुग्णांमध्ये जुन्नर शहरात (९), आर्वी (४), बेल्हे (३), ओझर(३), वारुळवाडी (३) तर बोरी, धालेवाडी, नारायणराव, खामगाव व आगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
लेण्याद्री कोविड केअर सेंटर तालुक्यासाठी वरदान
लेण्याद्री येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे. याकरिता लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने क्षणात सर्व सोयी सुविधा असलेला हॉल प्रशासनाला दिला होता. याठिकाणी सध्या १३० पॉझिटिव्ह रुग्ण असून दररोज सुमारे १५० संशयितांचे स्वॅब घेतले जात असल्याची माहिती येथील केंद्रप्रमुख डॉ. शाम बनकर यांनी दिली आहे.
दरम्यान येथील ऑनलाईन नोंदणी व स्वॅब घेण्यास उशीर होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी आमदार अतुल बेनके यांच्यासमोर मांडली. मात्र येणाऱ्या संशयितांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केल्यावर तेथूनच नंबर अलॉट होत असतो आणि त्याप्रमाणेच तपासणी केली जात असल्याचे येथील डॉ. बनकर यांनी सांगितले. आमदार बेनके यांनी याप्रसंगी सेंटरची पाहणी करत तेथील सोयी आणि समस्यांची माहिती घेतली.
सर्व स्तरांवर कोरोनाचा संसर्ग सुरू ; नागरिकांनी भान ठेवणे आवश्यक
तालुक्यातील 3 वैद्यकीय अधिकारी, जुन्नर शहरातील 2 नगरसेवक, परिचारिका, रुग्णवाहिका चालक, औषध दुकान, विविध आर्थिक व्यवहार असलेली आस्थापने, हॉटेल्स, रेशन दुकानातील व्यक्ती, चालक तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी आदी सर्वच स्तरावर कोरोनाने आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य याचे भान बाळगणे अत्यावश्यक बनले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्याच्या अखेरीस तालुक्यात झालेला 1 विवाह समारंभ गाजत आहे. त्या सोहळ्यास उपस्थितांची आकडेवारी आणि दिग्गजांची हजेरी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यानंतर सदर कार्यालय मालकाने कार्यालय बंद असल्याचा फलक तेथे लावला आहे. तर दुसऱ्या एका शहरातील औषध विक्रेत्याकडे मोठ्या संख्येने बाधित आढळले आहेत. त्यानंतर एका दुकानाच्या उद्घाटन समारंभानंतर ती राजकीय व्यक्तीदेखील करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. यासोबतच अनेक व्यावसायिकांना आपल्या येथील कर्मचारी बाधित आढळल्यानंतरही व्यापाराचा मोह आवरता न आल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहेत का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.