वेल्हे : वेल्हे तालुक्यात कोरोनाची लागण झालेले तब्बल 9 रूग्ण आढळून आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून वेल्हे तालुक्यात करोनाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वेल्हे तालुक्यातील वांजळे या गावात तर करोनाने थैमान घातले आहे. या एकाच गावातील रूग्ण संख्या तब्बल १६ वर गेली आहे.
पुण्यानजिक असलेल्या वेल्हे तालुक्यात करोनाना उग्र रूप धारण करायला सुरूवात केली असून सोमवार (दि.२०) रोजी वांजळेमधील 6 व वांगणीवाडीत 2 तर दापोड्यात 1 अशा 9 जणांना करोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कातील २७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहीती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी दिली आहे.
शनिवारी वांजळे गावातील 7 जणांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता.या सर्वांच्या संपर्कातील संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यामधील ६ जणांचा अहवाल सोमवारी पॉजिटिव्ह आला आहे. तालुक्यातील करोनाच्या रूग्णांची संख्या ६७ वर पोहचली आहे. तर रविवार (दि.१९) रोजी वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यासह त्यांच्या कुटूंबातील चार जणांना करोनाची लागण झाली आहे.त्यांनी पुणे येथे टेस्ट केली असता पॉजिटिव्ह आली आहे.