पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. सध्या रुग्ण दुप्पट होण्याचा वेग दहा ते बारा दिवस आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत आपल्याकडे तीन हजार पर्यंत रुग्णसंख्या वाढणार आहे. तसेच करोना पुढील सहा महिने शहरात राहणार आहे. त्यामुळे करोनासोबतच जगावे लागणार आहे, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
आयुक्त पुढे म्हणाले, झोपडपट्टीत करोनाचा प्रसार वाढत आहे. तेथील नागरिकांना होम क्वांरटाइन करण्याचे एक मोठे आवाहन आहे. लक्षणे दिसत नसल्याने नागरिकांना रुग्णालयात घेऊन जाताना अडचणी येतात. अशावेळी स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाला मदत करावी. बहुतांश रुग्णांचा भार वायसीएम रुग्णालयाने घेतला आहे. पाच टक्के रुग्ण आयसीयूमध्ये जातात. त्यामुळे पुढे तीन हजार रुग्ण झाल्यावर आपल्याकडे किमान 100 बेडचा आयसीयू पाहिजे. सद्यस्थितीत 92 बेडस उपलब्ध आहेत.
गर्भवती महिलांच्या प्रसूतिसाठी विशेष सोय
वायसीएम रुग्णालयातील प्रसुती विभाग गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवला आहे. तसेच गुंतागुंतीच्या प्रसुतीसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयातील 30 बेड आरक्षित केले आहेत. वायसीएम रुग्णालयातून ऱेफर केलेल्या गर्भवती महिलांची याठिकाणि विनामूल्य प्रसुती केली जाईल.
डी वाय पाटील रुग्णालयात 24 तास नियंत्रण कक्ष
डॉ. डी वाय पाटील रुग्णालयामध्ये वायसीएम रुग्णालयातून ऱेफर चिठ्ठी घेऊन गेलेल्या रुग्णांवरच मोफत उपचार केले जात आहेत. वायसीएम रुग्णालयात एक खिडकी सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी तेथून रेफर चिठ्ठी घेऊन उपचारासाठी डी वाय पाटील रुग्णालयात जाणे अपेक्षित आहे. तसेच डी वाय पाटील रुग्णालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना उपचारासाठी धावपळ करावी लागणार नाही.