बिजिंग – चीनच्या मध्यवर्ती हुबेई प्रांतातील वुहान शहरातील सर्व म्हणजे एक कोटी 10 लाख नागरिकांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. या भागात करोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. करोनाचा संसर्ग जगात सर्वप्रथम दीड वर्षभरापुर्वी या शहरात झाला होता.
या शहरात जून 2020 पासून एकही बाधीत आढळला नव्हता. मात्र सोमवारी येथे करोनाचे सात नवे बाधित आढळले. या शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचे लसीकरण वाढवण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
मेट्रोमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना कडक करण्यात आल्या आहेत. मास्कचा वापर, शरीराचे तापमान तपासणी, आरोग्य तपासणी बंधनकारक झुआनकाऊनजिकची अनेक स्थानके बंद करण्यात आली आहेत.
चीनमध्ये गेल्या दोन दिवसांत डेल्टा व्हेरीयंटचे 61 बाधित आढळले आहेत. किमान 18 प्रांतात नव्याने संसर्गित व्यक्ती आढळून येत आहेत.