महानगरपालिकेच्या तपासणी केंद्राने गाठला हलगर्जीपणाचा कळस
विठ्ठल लांडगे
नगर – महापालिकेच्या उद्यान विभागातील एका कर्मचाऱ्याने सोमवारी (दि.10) करोनाची लक्षणे जाणवत असल्याने चाचणीसाठी स्वॅब दिले. त्यानंतर बुधवारी (दि. 12) करोनाबाधितांच्या यादीत त्या कर्मचाऱ्याचे नावही आले. तथापि, त्या कर्मचाऱ्यास करोनाबाधित असल्याचा अहवाल न मिळाल्याने उपचार घेता आले नाहीत. महापालिकेच्या रामकरण सारडा करोना चाचणी केंद्रात अहवालच सापडत नसल्याचे यंत्रणा सांगत होती. या प्रकाराने महापालिकेच्या रामकरण सारडा येथील तपासणी केंद्राने हलगर्जीपणाचा कळस गाठला असल्याचे आज उघड झाले.
महापालिकेचे काही कर्मचारी करोनाबाधित झाल्याने महापालिका कर्मचारी युनियनने आक्रमक भूमिका घेऊन महापालिका बंद ठेवण्यास प्रशासनाला भाग पाडले. तथापि, करोनाबाधित असल्याची लक्षणे असणाऱ्यांना तपासणी करुन घेण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागातील संबंधित कर्मचाऱ्याने 10 तारखेलाच करोना चाचणीसाठी महापालिकेच्या रामकरण सारडा येथील करोना स्वॅब दिले.
दरम्यान, तो कर्मचारी कालच पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, चार दिवसानंतरही अजून त्या कर्मचाऱ्यावर कोणतेच उपचार होऊ शकलेले नाहीत. करोनाबाधितांच्या यादीत नाव आल्याने संबंधित कर्मचाऱ्याच्या नातलगांनी त्याला उपचारासाठी नगरमधील कोविड रिकव्हरी सेंटरमध्ये दाखल करण्याचे प्रयत्न केले. तथापि, अगोदर तुमचा करोना चाचणीचा अहवाल दाखवा, अशीच सूचना कोविड सेंटरमधून मिळत राहिली. त्यामुळे करोनाबाधित असल्याची स्पष्ट कल्पना असुनही महापालिकेचाच कर्मचारी सुविधांविना चार दिवस त्रास सहन करत आहे.
या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, सर्वांनीच टोलवाटोलवीची उत्तरे देण्याचे काम केले. महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याचेच असे हाल सुरु असतील, तर सामान्य नागरीकांनी स्वत:ला वैद्यकीय सुविधा कशा मिळवायच्या, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. दरम्यान, याचवेळी अन्य काही खासगी व्यक्तिंचे अहवालही मिळत नसल्याच्या तक्रारी यावेळी सुरु होत्या. मात्र, तेथील यंत्रणा सर्वांकडेच दूर्लक्ष करत होती, असा आरोप होत आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाचा एक कर्मचारी करोनाबाधित असल्याचे निदान झालेले आहे. करोनाबाधितांच्या यादीत त्याचे नावही आलेले आहे. तथापि, करोनाबाधित असल्याचा अहवाल महापालिकेच्या रामकरण सारडा येथील तपासणी सेंटरमधून मिळत नसल्याने तो कर्मचारी करोनाबाधित असूनही त्याच्यावर उपचार करणे अजून शक्य झालेले नाही.
शशिकांत नजन ,उद्यानविभाग प्रमुख, महापालिका.
करोना चाचणीचे अहवाल गायब झालेले नसावेत. काहीतरी गैरसमज असतील. तथापि, या विभागाच्या कामाची जबाबदारी महापालिकेचे आरोग्याधिकारी अनिल बोरगे यांच्याकडे आहे. त्या संदर्भात त्यांच्याकडेच विचारणा करावी लागेल.
डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त, महानगरपालिका
जबाबदार असलेल्या यंत्रणेची फोनाफोनीनंतर झाली धावपळ..!
महापालिकेच्या रामकरण सारडा येथील सेंटरमधून करोना चाचणीचे काही अहवाल गायब असल्यासंदर्भात आरोग्याधिकारी अनिल बोरगे यांच्याशी दैनिक प्रभातने संपर्क असता, मला या संदर्भात आत्ता मला काहीच माहिती नाही. सेंटरवर पोचून माहिती घेतल्यानंतर त्यावर बोलतो, अशी भूमिका डॉ. बोरगे यांनी स्पष्ट केली. दरम्यान, त्यानंतर काही वेळानंतर बोरगे यांनी स्वत: संपर्क करुन सेंटरवर दुपारनंतर अहवाल मिळतील, अशी माहिती “प्रभात’ला दिली. तेथील अधिकाऱ्यांकडे संशयितांना संपर्क करता येईल, असेही सांगितले. दरम्यान, तोपर्यंत करोनाबाधित असलेल्या त्या कर्मचाऱ्याच्या मुलाने थेट विळद येथून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या करोना तपासणी सेंटरमधून दुसरी प्रत मिळविली, असल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजन यांनी दुपारनंतर दिली.